पुणे – शहराच्या एका भागात पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील जलद बस वाहतूक (बीआरटी) मार्ग दिवसेंदिवस घटत आहेत. मात्र, दुसरीकडे शेजारीच असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये बीआरटीचा विस्तार होत आहे. मागील काही वर्षांत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ५० किलोमीटरची बीआरटी असून पुण्यात फक्त आता १७ किलोमीटरची बीआरची शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुण्यात बीआरटी राबविण्यात महापालिका उदासीन आहे का? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या जलद वाहतुकीसाठी शहरात २००७ मध्ये हडपसर-स्वारगेट-कात्रज या मार्गावर पथदर्शी ‘बीआरटी’ सुरू करण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने बीआरटी मार्ग वाढविण्यात आले. पुण्यात संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते आपलं घर हे नवीन मार्ग सुरू करण्यात आले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत देखील बीआरटी मार्ग सुरू करण्यास सुरुवात झाली.
पण, तोपर्यंत पुण्यातील बीआरटी फसल्याचे दिसू लागले. त्यामुळे हडपसर ते स्वारगेट हा बीआरटी मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर संगमवाडी येथील रस्ता करण्यासाठी तेथील काही मार्गावरील बीआरटी काढण्यात आली. तर, नगर रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी काही बीआरटी मार्ग बंद ठेवण्यात आले. आता तर येरवडा ते विमाननगर चौकादरम्यानची बीआरटी काढण्यात आली आहे. त्यामुळे नगर रस्त्यावर देखील फक्त पाच किलोमीटरच बीआरटी शिल्लक राहिली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* जलद वाहतुकीसाठी २००७ मध्ये बीआरटी सुरू
* टप्प्या टप्प्याने विस्तार
* रस्तेकामासाठी हळूहळू बीआरटी काढायला सुरुवात
* चालू वर्षांत अनेक मार्ग बंद
पुण्यात फक्त एक मार्ग पूर्ण क्षमतेने
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सध्या बीआरटी एकूण आठ मार्ग असून त्याचे अंतर ६९.५ किलोमीटर आहे. या बीआरटी मार्गातून दिवसाला साधारण ८०० बस धावतात. त्यामधून साधारण सहा लाख प्रवासी प्रवास करतात. एकूण बीआरटी मार्गापैकी पाच मार्ग पिंपरी चिंचवड परिसरात सुरू आहेत. तर, पुण्यात तीन बीआरटी मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एकूण ५० किलोमीटर बीआरटी सध्या सुरू आहे. तर, पुण्यात फक्त १७ किलोमीटर बीआरटी धावत आहे. त्यातही फक्त एका मार्गावर पूर्ण क्षमतेने बीआरटी सुरू आहे.