पुणेकरांबरोबर विमान प्रवास चौदा दिवस प्रशासनाचा राहणार वॉच करोनाचा एकही संशयित नाहीः जिल्हाधिकारी
नगर – पुण्यात आढळलेल्या करोनाग्रस्त दाम्पत्याबरोबर दुबईवरुन परतलेल्यांमध्ये नगरमधील चौघांवर आता आरोग्य विभागाचा वॉच राहणार आहे.
या चौघांना करोनाचा व्हायरल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, करोना विषाणू संदर्भात कोणीही अफवा पसरवू नये, नगर जिल्ह्यात व शहरात एकही संशयित आढळून आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुबईवरून आलेल्या चौघांना करोना व्हायरस अशा प्रकारच्या पोस्टस् समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने नगरमध्ये मंगळवारी दुपारपासून एकच खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर एक खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या हवाल्याने दुबईहुन परतलेल्या प्रवाशांची यादी नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांकासह व्हायरल झाली. या यादीत नगरच्या चौघांचा समावेश असल्याचे समोर आल्याने नगरकरांमध्ये चिंता निर्माण झाली.
दुबईची सहल करून आलेल्या 40 जणांच्या ग्रुपमधील दोघा पुणेकरांचा करोनाची बाधा झाली आहे. त्याच ग्रुपमध्ये नगरच्या एका कुटुंबातील चौघांचा समावेश होता. 1 मार्चला ते भारतात आहे. या चौघांचा शोध घेण्याचे सांगण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांची सर्व महिती घेतली असता त्या चौघांना करोनाची बाधा झाली नसल्याचे समोर आहे. तरी प्रशासनाने खबरदारी म्हणून या चौघांना घराबाहेर न पडण्याचे सांगितले आहे.
पुण्यात दोन करोनाग्रस्त आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली. या लोकांच्या यादीत नगरसह बीड, मुंबई, ठाणे, यवतमाळ आदी भागातील प्रवाशांची नावे होती. ही यादी समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर शासकीय यंत्रणेनेही संबंधीत चौघांचा शोध घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे.
या यादीवरुन अफवांचे पीक वाढु लागल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही स्पष्ट खुलासा करत संबंधीत चौघांमध्ये करोनाची लक्षणे आढळली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता योग्य काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. द्विवेदी म्हणाले, नगरमधील चौघे दुबईवरून आले.
1 मार्चला नगरला दाखल झालेल्या या चौघामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक असल्याचे ते म्हणाले.