संदीप राक्षे
सातारा – पुण्यात करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडल्याने सातारा जिल्ह्यातही अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी असून प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे.
परदेशवारी करून आलेल्या अथवा करोना विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसून आल्यास रुग्णांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी तातडीने करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी केले आहे. साताऱ्यात करोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. मात्र, शंभर किलोमीटरवर असलेल्या पुणे शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने साताऱ्यातही अस्वस्थतेचे वातावरण आहे. साताऱ्यात करोनाच्या संसर्गापेक्षा त्याविषयीच्या अफवांचा बाजार गरम झाला आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीने करण्यात आले आहे, तरीही भीतीचे वातावरण आहे.
होळी व धुलवडीवर करोनाचे सावट होते. साताऱ्यातील औषद दुकानांमधून अल्कोहोलमिश्रीत हॅंड सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे. घशात खवखव, ताप, सर्दी इत्यादी समस्या असलेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षात गर्दी वाढत आहे.
एन-95 मास्क साताऱ्यात नाहीत
करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एन-95 या मास्कचा वापर प्राधान्याने केला जात आहे. पुणे शहरात करोनाबाधितांची संख्या पाच झाली असून तेथे रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी हे मास्क उपलब्ध आहेत. साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात सहा खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष असून तेथे एक वैद्यकीय अधिकारी व सहा परिचारिका तैनात आहेत.
करोनाबाधित व स्वाइन फ्ल्यूमध्ये अंगदुखी, घसा खवखवणे, नाक गळणे अशी सामायिक लक्षणे आहेत. कोरडा खोकला व सर्दी नसताना श्वसनात अडथळा येणे, ही करोनाची लक्षणे आहेत.
अशी लक्षणे आढळलेल्या वीस हजार रुग्णांची तपासणी गेल्या तीन महिन्यांत करण्यात आली आहे. ज्यांनी गेल्या दोन महिन्यांत परदेश प्रवास केला आहे आणि ज्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे, अशा 11 लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
पुण्यातील संशयितांची माहिती गोपनीय
पुण्यात आढळलेल्या करोनाच्या संशयित रुग्णांचा कोणताही तपशील जाहीर न करण्याची सूचना विभागीय आयुक्तांनी दिली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन सार्वजनिक स्वच्छता व सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीची ठिकाणे टाळा, लहान मुलांची व बाधित व्यक्तींची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे करा
-आपले हात वारंवार स्वच्छ धुवा
-खोकणाऱ्या अथवा शिंकणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहा
-डोळे, नाक व तोंडाला हाताचा स्पर्श टाळावा
-टिश्यूपेपर गरजेप्रमाणे वापरून त्यांची त्वरित विल्हेवाट लावावी.
-ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास होत असेल
-तर वैद्यकीय सल्ला घ्या
हे टाळावे
ताप व खोकला असलेल्या व्यक्तशी निकटचा संपर्क
कच्चे व अर्धवट शिजलेले अन्न खाणे
कचरा अथवा कत्तलखान्याच्या ठिकाणी जाणे
उघड्यावर थुंकणे
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णाच्या खोकल्यातून करोनाचे विषाणू इतरांच्या श्वसन मार्गात गेले तरच हा आजार होतो. त्यामुळे प्रत्येकाशी किमान दोन मीटर अंतर ठेवून संपर्क साधावा. नागरिकांनी स्वच्छ धुतलेले कॉटनचे रुमाल वापरल्यास संसर्ग टाळणे सहज शक्य आहे.
डॉ. आमोद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा.