कोल्हापूर/प्रतिनिधी – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दिला जाणारा यंदाचा (2022) राजर्षी शाहू पुरस्कार हा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती जिल्हा परवठा अधिकारी व ट्रस्टचे सचिव दत्तात्रय कवितके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 26 जून रोजी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळामध्ये 2020 मधील शाहू पुरस्कार प्राप्त डॉ. तात्याराव लहाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 2020 मध्ये कोरोना संसर्गामुळे पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापनाा1976 मध्ये झाली ट्रस्टमार्फत गेली तीस वर्षे अखंडपणे व्याख्यानमाला व शाहूंच्या विचारांचा प्रसार केला जातो.
ट्रस्टमार्फत1984 पासून राजश्री शाहू पुरस्कार देण्यात येतो. समाजप्रबोधन साहित्य कला संस्कृती संगीत क्रीडा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार हा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जनार्दन वाघमारे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. वाघमारे हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कौठा येथील आहेत. 11 नोव्हेंबर 1934 रोजी त्यांचा जन्म झाला.
इंग्रजीतून एमए शिक्षण झाले. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून निग्रो साहित्यावर पीएचडी केली. इंग्रजी विषयाची व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 1977 मध्ये लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य झाल्यानंतर 24 वर्षाच्या कार्यकर्ते त्याने अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले गुणवत्ता वाढीचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. 2001 मध्ये लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. 2008 ते 2014 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.
आत्तापर्यंत त्यांनी 47 पुस्तके लिहिली आहेत. त्यांना पंजाब विद्यापीठाची डिलीट पदवी मिळाली आहे. स्वामी रामानंंद तीर्थ विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांची कामगिरी संस्मरणीय राहिली. त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल 25 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पत्रकार परिषदेला विश्वस्त डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.अशोक चौसाळकर, प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे उपस्थित होते