नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीतील संयुक्त उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांची पुढील बैठक 20 किंवा 21 जूनला मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीचे यजमानपद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असेल.
राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विरोधकांची पहिली बैठक बुधवारी देशाची राजधानी दिल्लीत झाली. ती बैठक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावली होती. पहिल्या बैठकीत अनेक विरोधी पक्षांनी पवार यांच्याकडे उमेदवार बनण्याचा आग्रह धरला.
मात्र, पवार यांना राजी करण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे पर्यायी नावांवर प्राथमिक चर्चा झाली. आता पुढील बैठकीत उमेदवार म्हणून व्यापक सहमती मिळवू शकणाऱ्या नावांचा विचार होईल.
त्या बैठकीतच विरोधकांचा संयुक्त उमेदवार ठरणार का याविषयीही औत्सुक्य असेल. देशाच्या लोकशाही मुल्यांचे अनुनय करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे.
विरोधकांच्या पुढील बैठकीला काही दिवसांचा अवधी असल्याने आणखी काही नावे चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.