बारामती- बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबीयांचा भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेने पाडव्याच्या दिवशी भेटीसाठी बारामतीत येऊ नये, असे आवाहन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. यंदा करोनामुळे संसर्ग होऊ नये या उद्देशाने हा कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे ही माहिती दिली.
दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी राज्यातून लोक पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी करतात. यंदा करोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरूनच शुभेच्छा द्याव्यात. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. करोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करूया, असे आवाहन पवार कुटुंबीयाने केले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे. बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम यावर्षी रद्द केल्याबद्दल कुटुंबीयाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
करोना साथीत नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचे निश्चित दुःख आहे. करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे. तरी यंदाची दिवाळी आपण आपल्या घरी, नियमांचे पालन करून सुरक्षित साजरी करीत स्वत:सह कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवू, असे आवाहन निवेदनात केले आहे.