नगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज दिवसभरात शहरात 123 रुग्ण आढळून आले तर, 152 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बोल्हेगावमधील मनोलिला नगरमध्ये संसर्ग वाढल्याने कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला.
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. नगर शहरात रुग्ण वाढीचा दर सर्वात जास्त आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. विना मास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल बाजारपेठेत फिरून विना मास्क फिरणार्यांवर कारवाई केली.
दरम्यान, शहरातील बोल्हेगाव परिसरातील मनोलिला नगरमध्ये करोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला. त्या परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तेथील अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, वस्तू विक्री सेवा शनिवारी (दि. 13) दुपारी दोनपासून 26 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसा आदेश महापालिका प्रशासनाने काढला आहे.
या भागातून नागरिकांना ये-जा करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.