नगर (प्रतिनिधी) – बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना नाशिक जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांनी अन्य दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. पैशावरूनच हिरण यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
संदीप मुरलीधर हांडे (वय 26 रा. माळेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय 25, रा. सप्तश्रृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर, जि. नाशिक), अजय राजू चव्हाण (वय 26, रा. पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर, जि. नाशिक), नवनाथ धोंडू निकम (वय 29 रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव, जि. नगर) व एक 22 वर्षीय आरोपीचा गुन्ह्यात समावेश आहे.
1 मार्च 2021 रोजी बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण दुकान बंद करून सायंकाळी सात वाजता श्रीरामपूरला जाण्यासाठी निघाले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले होते. त्याबाबत गौतम हिरण यांचे भाऊ पंकज झुंबरलाल हिरण यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
अपहरणकर्त्यांनी गौतम हिरण यांची हत्याकरून मृतदेह श्रीरामपूर वाकडी रस्त्यावर टाकले होते. 7 मार्च रोजी ही घटना घडकीस आली. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने काही मुद्द्यांचे विश्लेषण केले असता संदीप मुरलीधर हांडे याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली देऊन अन्य आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना नाशिक व नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले.
पैशासाठी त्यांनी हिरण यांचा हत्या केल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासात पुढे आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला एक मोबाइल व मोटारकार जप्त केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, विश्वास बेरड, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक शिंदे यांच्या पथकाने केली.
चौकशी करून कारवाई होणार
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी सागर गंगावणे, बिट्टू उर्फ रावजी वायकर यांना अटक केली होती. प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले होते. मात्र, अन्य तपासाला वेळी दिशा मिळाली आणि पोलिसांनी संदीप मुरलीधर हांडे यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यांच्या गुन्ह्यात वापरलेली मोटारकारही जप्त केली. त्यामुळे पोलीस आरोपींबद्दल चौकशीकरून पुढील कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून समजले.