पुणे – नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 15 मोबाईल समर्थ पोलिसांनी शोधून दिले आहेत. यातील पाच मोबाईल कर्नाटक राज्यातून हस्तगत करण्यात आले. यासंदर्भात नागरिकांनी लॉस्ट ऍण्ड फाऊंड वेबसाईटवर तक्रारी नोंदवल्या होत्या.
घाईगडबडीत किंवा गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीसाठी पोलीस आयुक्तांनी लॉस्ट ऍण्ड फाऊंड अंतर्गत वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सोय केली आहे. या ठिकाणी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऑक्टोबर 2020 पासून गहाळ झालेल्या मोबाईल संदर्भात पोलीस कर्मचारी सुभाष मोरे हे सातत्याने मोबाईल कंपन्यांकडे पाठपुरावा करत होते.
यातील पाच मोबाईल हे कर्नाटक तर दहा मोबाईल हे राज्यात विविध ठिकाणी वापरले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोरे यांनी मोबाईल वापरकर्त्यांकडे संपर्क साधून ते वापरत असलेले मोबाईल संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याची जाणीव वापरकर्त्यांना करुन दिली. त्यानूसार कर्नाटक येथे वापरात असलेले पाच मोबाईल तेथील पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आले.
यानंतर कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून संबंधीत पाच मोबाईल वापरकर्त्यांना समर्थ पोलीस ठाण्यात पाठविण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात वापरत असलेले दहा मोबाईल देखील मिळवण्यात आले. हे मोबाईल तक्रारकर्त्या नागरिकांना नुकतेच देण्यात आले.
यावेळी त्यांच्याकडून समर्थ पोलिसांचे आभार मानण्यात आले. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनी केली.