पुणे – मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यावेळी गजानन काळे यांनी “राज्यात दोनच माणसे अशी आहेत की त्यांना वाटतं आपूनच भगवान है..! ते म्हणजे संजय राऊत आणि अभिजित बिचुकले हे दोघेही कडक गांजा ओढतात’ अशी टीका मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली होती. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून अभिजित बिचुकले यांनी गजानन काळे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी अभिजित बिचुकले म्हणाले, “गजानन काळे याचं नाव आज पासून गांजा काळे आहे… हे संपूर्ण महाराष्ट्राने लक्षात ठेवा जानन काळे यांसारखे लोक पक्षात ठेवल्यामुळे राज ठाकरे यांचा पक्ष हा 14 आमदारांपासून एका आमदारापुरता सीमित झाला आहे.. तुला गमंत सांगतो राज दादा आहे माझा’. असं ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “चल ठीक हाय की तुमचं आणि संजय राऊतांच काही वैर असेल. तू काय म्हणतो अभिजित बिचुकले गांजा ओढतो? तुझ्या सातशे पिढयांना तरी माहित आहे का की अभिजित बिचुकलेची औकात काय आहे? अभिजित बिचुकलेची जात, धर्म महाराष्ट्राच्या नावात आहे’. असं देखील यावेळी अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत. यावेळी ते एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.