मुंबई – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा परिसरातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारल्याचं दिसून आलं आहे. धंगेकर यांचा तब्बल 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे.
कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात रवींद्र धंगेकर हे किंगमेकर ठरल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कसब्यातील निकालाबाबत आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “रविंद्र धंगेकर चारचाकित कधी बसत नाहीत. हा दुचाकीवर फिरणारा नेता आहे. म्हणून लोक त्यांना मतदान करतील हे माहिती होतं”, असं शरद पवार म्हणालेत.
गिरीश बापटांनी तिथं प्रतिनिधित्व केलं आहे. बापटांची गोष्ट वेगळी होती. त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. पण त्यामुळे मतदार संघ जड जाईल असं काही लोकं म्हणत होते. पण तिथं बापट आणि टिळकांना डावलून निर्णय घेतले गेला. त्याचा भाजपला फटका बसला, असं शरद पवार यावेळी म्हणाले. ते माध्यमांशी सवांद साधत होते.