पुणे – पोलीस असल्याची बतावणी करून तब्बल 5 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी अडीच लाख रुपये “फोन पे’द्वारे स्वीकारण्यात आले होते. तर एक लाख रोख आणि उर्वरित रक्कमेचा मोबाइल स्वीकारण्यात आला होता.
या प्रकरणामध्ये मधुकर विलास सापळे (वय 32, रा. आंबेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्याने जामिनासाठी ऍड. राकेश सोनार यांच्यामार्फत अर्ज केला होता. ऍड. सोनार यांना ऍड. महेश देशमुख, ऍड. सुदर्शन खाडे आणि ऍड. विक्रांत सोनवणे यांनी मदत केली.
याबाबत विमाननगर येथील 32 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 14 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादीवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, असे खोटे सांगून, तसेच राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी ही रक्कम स्विकारण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.