पुणे – शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातलेले असतानाच वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून तुंबलेल्या ड्रेणेजमुळे थेट मैलापाणीच रस्त्यावर येत आहे. पानमळा वसाहत येथील आम्रपाली बुध्द विहाराच्या समोर असलेले ड्रेणेजलाईन वारंवार तुंबत असल्याने त्यातून थेट मैलाच रस्त्यावर येत आहे.
परिणामी या भागात मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या परिसरातील अनेक लहान मुले तसेच नागरिक आजारी पडले आहेत. त्या पेक्षाही वाईट् बाब म्हणजे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय तसेच ड्रेणेज विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, याबाबत तातडीनं कारवाई न झाल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांना या भागात आणून या पाण्यात उभे करून त्रास काय असतो याची जाणीव करून दिली जाईल असा इशारा माजी नगरसेवक राहूल तुपेरे यांनी दिला आहे.
पुणे: मुख्य रस्त्यावरच वाहतेय मैलापाणी; गजबजलेल्या सिंहगड रस्त्यावरील प्रकार.. pic.twitter.com/2ATVVeSVI5
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 3, 2022
याबाबत माहिती देताना तुपेरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणचे ड्रेणेज सकाळी-संध्याकाळी तुंबत आहे. त्यामुळे या चेंबरमधून थेट मैला बाहेर येत असून तो पाण्या सोबत मुख्य सिंहगड रस्त्यावर येत आहे. या ठिकाणी नागरिक वाहने पार्क करतात तर वसाहतीत जागा नसल्याने अनेक लहान मुले-नागरिक या रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत येऊन थांबतात. मात्र, या घाण पाण्यामुळे या भागात डासांचा प्रदूर्भाव वाढला असून दुर्गंधीने आसपासच्या नागरिकांना जगणेही मुश्किल झाले आहे.
याबाबत वारंवार सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या घनकचरा आणि ड्रेणेज विभागाशी संपर्क साधला आहे. मात्र, या प्रकाराकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, तातडीनं यावर तोडगा न काढल्यास या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना सोबत घेऊन आम्ही अर्धा तास या मैलापाण्यात उभे राहू मग त्यांना आमच्या वेदना समजतील असेही तुपेरे म्हणाले.