मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी चाहते कधी त्याच्या घराबाहेर उभे राहतात तर कधी त्यासाठी एखादा टॅटू काढतात. आपल्या देशात अभिनेत्यांना आदर्श मानणारे अनेक फॅन्स आहेत. चित्रपटापूर्वी अभिनेत्याच्या भल्या मोठ्या पोस्टरला दुग्धाभिषेक करणे ही आता फॅशनच झाली आहे. सेलिब्रेटीसाठी चाहते काय करतील हे सांगणं खूप कठीण आहे. फॅन्सने तर अनेक अभिनेत्याची मंदिरे देखील उभी केली आहेत. हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. या मंदिरांमध्ये त्या त्या अभिनेत्याची पूजा देखील केली जाते.
कोरोनाच्या काळात लोकांना मदत करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला चित्रपट अभिनेता सोनू सूदचा दर्जा त्याच्या चाहत्यांच्या हृदयात देवापेक्षा कमी नाही. तेलंगणातील एका गावात लोकांनी सोनू सूदसाठी मंदिर बांधले आहे. तेलंगणातील डुब्बा तांडा गावातील लोकांनी ४७ वर्षीय सोनूच्या नावावर मंदिर बांधून त्याला देवाचा दर्जा दिला आहे. लोक तिथे सोनू सूदची पूजा देखील करतात.
जुन्या कोलकात्याच्या बालीगंज भागात अमिताभ बच्चन यांना समर्पित मंदिर आहे. दोन खोल्यांच्या मंदिरात पहिल्या खोलीत सुपरस्टारच्या चित्रपटातील छायाचित्रांचा संग्रह असलेले एक संग्रहालय आहे, तर दुसऱ्या खोलीत तुम्हाला अमिताभ बच्चन यांची मूर्ती दिसेल. अमिताभ बच्चन यांची चाहत्यापेक्षा भक्त म्हणून पूजा करणाऱ्या संजय पटोडिया यांनी २००३ मध्ये हे मंदिर बांधले.
साऊथ स्टार रजनीकांत यांचे देखील त्यांच्या चाहत्यांनी एक मंदिर उभे केलेलं आहे. या मंदिरात रजनीकांत यांची मूर्ती मात्र नाही. हे मंदिर कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील कोटिलिंगेश्वर मंदिराचा एक भाग आहे. या मंदिरात इतर सर्व लिंगांप्रमाणेच मंदिराच्या पुजाऱ्यांनी विशेष पूजा आणि वैदिक मंत्रोच्चारानंतर रजनीसाठी शिवलिंगाची स्थापना केली असलयाचे समजते.