फलटण ग्रामीण – फलटण तालुक्यात बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने विडणी येथे ओढ्याला महापूर आल्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग रात्री नऊपासून आज सकाळी दहा वाजेपर्यंत जवळपास 13 तास वाहतूक ठप्प होती. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर रांगा लागल्या होत्या.
फलटण तालुक्यात काल मुसळधार पाऊस पडल्याने परिसरातील तसेच ग्रामीण भागातील शेतीचे, पिकांचे, पशुंचे अतोनात नुकसान झाले. यांसह विडणी येथील पाझर तलाव अगोदरच पूर्ण क्षमतेने भरल्याने कालच्या पावसाने विडणीतील नदीवजा ओढ्याला रात्री नऊच्या सुमारास पूर आल्याने महामार्गावर जवळपास 13 तास वाहने अडकून पडली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूस तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ओढयावरील पाण्याच्या प्रवाहाने प्रचंड असा वेग असल्याने ओढ्यावर संरक्षणाकरीता लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिगेट उन्मळून वाहून गेल्या. राजाळे मंडलात काल दिवसभरात सर्वाधिक 156 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने विडणी परिसरातील अनेक झाडे, रस्ते, पूल वाहून गेले असल्याने अनेक भागातील संपर्क तुटला आहे.
अनेक मार्गावर व गावातही अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे स्त्यावर पडली आहेत. तसेच शेतातील ऊस, मका, डाळिंब, द्राक्षे आदींसह अनेकांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ओढ्याचे पाणी शिरुन हजारो कोंबडया (पक्षी) मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे मंडलाधिकारी व गाव कामगार तलाठ्यांनी त्वरीत पंचनामे करून शासनाला आवाहल सादर करावा. जेणेकरून या नुकसानीबाबत लोकांना त्वरीत शासनाकडून भरपाई मिळेल, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.