मल्हारपेठ – पाटण तालुक्यातील अनेक गावे दुर्गम डोंगराळ असल्याने त्या-त्या गावांसाठी एकमेव दळणवळणाचे साधन असणारी एस. टी. सेवा करोना काळात बंद आहे. पाटण आगारातून सध्या 32 फेऱ्या सुरू असल्यातरी अद्याप अनेक गावे वंचितच आहेत. तालुक्यातील सर्वच विभागाची गरज ओळखून एस. टी. सेवा मर्यादित स्वरूपात तरी सुरू करण्याची गरज आहे.
पाटण तालुक्याची भौगोलिक रचना पहिली असता तालुक्याचे विविध डोंगरदऱ्यांनी वेगळे केले आहेत. ढेबेवाडी विभाग तर सुमारे तेरा किलोमीटर अंतराच्या दिवशी घाटाने, तारळे, मोरगिरी विभागही पाटणपासून सुरू होणाऱ्या आणि तारळेच्या पायथ्याशी संपणाऱ्या मोठ्या घाट रस्त्याने वेगळा केला आहे.
याबरोबर कोयनानगर, मल्हारपेठ, चाफळ असे तालुक्याचे विभाग आहेत.
प्रत्येक विभागाची वेगळी ओळख आणि बाजारपेठ आहेत. त्यामुळे या विभागातंर्गत तसेच प्रत्येक विभागातून तालुक्याच्या ठिकाणी जनतेला या ना त्या कारणाने यावे लागते. सध्या करोना काळात गेले सहा महिने जनजीवन ठप्प झाले होते. सध्या जनजीवन पूर्व पदावर येत असून अनेक नियम व निर्बंध शिथील होत आहेत. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याची बस सेवा सुरू होण्याची गरज आहे.
सध्या, पाटण आगारातून 32 फेऱ्या सुरू आहेत. पाटण-कुसरूंड, पाटण-नाटोशी, पाटण-चाफोली, पाटण-सातारा, पाटण-कोयना, पाटण-कराड, पाटण-मुंबई, पाटण- बोरिवली, पाटण – पुणे, पाटण- बारामती अशी वाहतूक सुरू आहे. ढेबेवाडी, तारळे, मारुल हवेली विभागात एसटी सेवा नाही. त्यामुळे खासगी वाहतुकीची मदत घ्यावी लागत आहे. त्यांनी प्रवाशी दरात वाढ केल्याने नागरिकांना आर्थिंक भुर्दंड बसत आहे.