देशभरामध्ये सध्या कोरोना विषाणूचं संकट फोफावताना दिसतंय. अशातच महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सध्या राज्यसरकारने कंबर कसली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच शहरी भागातील महाविद्यालये, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स बंद केले असून आज राज्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला देखील स्थगिती देण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्यानं हे टाळण्यासाठी राज्यातील काही खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. घरून काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम ही संकल्पना तशी पाहायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात घरातून काम करणं किती अवघड आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सदर व्हिडिओमध्ये एक पत्रकार महाशय आपल्या घरातील एका खोलीमधून वृत्तवाहिनीला लाईव्ह माहिती देत असतानाच त्यांची लहानगी मुलं खोलीत प्रवेश करतात. वृत्तवाहिनीवरील कार्यक्रम लाईव्ह असल्याने हे लहानगे वडिलांच्या ‘कामाच्या’ ठिकाणी धमाल करताना कॅमेऱ्यात टिपले गेले. सदर बाब घरातील महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर ती तातडीने दोन्ही मुलांना त्या खोलीतून बाहेर घेऊन गेली मात्र तोपर्यंत या दोन्ही लहानग्यांची मस्ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी केली जात असतानाच घरून काम करणं किती अवघड गोष्ट आहे हे विनोदी अंगाने उलगडणारा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना मोहिनी घालत आहे.
The trouble in work from home .. so a journalist should never work from home . Watch it #bbc #workfromhome #journalistlife pic.twitter.com/hu30RHKNls
— Lokesh journo (@Lokeshpaila) March 13, 2020