पिंपरी -करोना संक्रमण होऊन गेलेल्यांची तसेच करोना लढ्यासाठीच्या ऍन्टिबॉडिज (प्रतिपिंडे) शरीरात असल्याची ओळख देणारा सेरोलॉजिकल सर्व्हे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये केला जाणार आहे.
यामुळे शहरातील किती टक्के नागरिकांच्या शरीरात करोना विरोधात लढण्यासाठी ऍन्टिबॉडिज आहेत, याची माहिती घेता येणार आहे. तसेच यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी उपयायोजना करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील किती लोकसंख्या करोना संक्रमित आहे, याची तपासणी करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांमधील करोना संक्रमणाचा मागोवा घेण्यासाठी ऍन्टिबॉडिजची तपासणी करण्यात येणार आहे.
त्यानुसार शहरात अंदाजे किती टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार होत आहे याचा अंदाज घेण्यास मदत होणार आहे. सेरो सर्व्हेत शहरातील भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या घटकातील व वेगवेगळ्या वयोगटातील तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांमधील ऍन्टिबॉडिज तपासणी करण्यात येणार आहे.
यामुळे पुढील काळात शहरातील व्यक्तींच्या वय व स्थानानुसार वर्गीकरण करुन त्यांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्यासाठी या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे.
सेरो सर्व्हे म्हणजे काय?
विशिष्ट कारणासाठी अनेकांची रक्त तपासणी केली जाते. त्याला सेरॉलॉजिकल सर्व्हे असे म्हणतात. या तपासणीद्वारे रक्तात काही आजारांसाठी ऍन्टिबॉडिज तयार झाल्या आहेत का, याविषयी तपासणी केली जाते. त्या व्यक्तीच्या शरिरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करून आजारास सामोरे जाण्याच्या प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधले जाते. यावरून संसर्गाच्या प्रमाणाचाही अंदाज येतो.