मुंबई : 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं. मुंबईतील वरळी भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.
डॉ. निताशा बंगाली आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. गुरुवारी तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली.
निताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निताशाची आईही डॉक्टर आहे, तर तिचे वडील इंजिनिअर आहेत. निताशा एमबीबीएस डॉक्टर होती, तर एमडीचे शिक्षण घेत होता. आतापर्यंत तिच्याकडे कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.