पुणे -डॉन दाऊद इब्राहिम आणि बंडू आंदेकरची ओळख असल्याचे सांगत सदाशिव पेठेतील बांधकाम व्यावसायिकाला धमक्या दिल्या. व्याजाने घेतलेले 30 लाख आणि त्याबदल्यात 40 लाख व्याज घेऊनही आणखी 30 लाख रुपये देण्यासाठी धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे.
शशिकांत गोलांडे (वय 76) आणि नीलेश देशपांडे (वय 47) यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “35 वर्षीय फिर्यादी यांनी 2010 मध्ये बांधकामाला सुरुवात केली होती. यादरम्यान त्यांची गोलांडे याच्याशी ओळख झाली होती. 2015 फिर्यादी यांना पैशांची चणचण जाणवू लागली.
याबाबत शशिकांतला समजले असता, त्याने फिर्यादीला “मी व्याजाने पैसे देतो, ‘असे सांगितले आणि 7 टक्के व्याजाने 30 लाख रुपये घेतले. महिन्याला त्याचे ते 2 लाख 10 हजार रुपये व्याज देत असे. 2018 पर्यंत त्यांनी 40 लाख रुपये व्याज दिले. तर, मुद्दलदेखील परत केले. मात्र, गोलांडे याने आणखी 30 लाख रुपयांची मागणी सुरू केली.
तर नीलेश देशपांडे याने पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे देऊन टाकण्याची धमकी दिली. एकेदिवशी गोलांडे, देशपांडे हे फिर्यादीचे घरी गेले. आई-वडिलांना “मुलाला पैसे देण्यास सांग’ असे म्हणत नीलेशने बंडू आंदेकर आणि दाऊदसोबत ओळख असल्याचे सांगत ठार मारण्याची धमकी दिली,’ असे सांगण्यात आले.