नवी दिल्ली :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक विधान केले होते. मोदींनी भारतातील अल्पसंख्यकांकडे लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी दिला होता आणि माझी मोदींशी बोलणी झाली असती तर मी त्यांना हेच सांगितले असते असे ओबामा म्हणाले होते. त्यावरून ओबामांवर भारतात बरीच टीकाही झाली.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अमेरिकेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता व्हाइट हाउसकडून म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थानातून खुलासा करण्यात आला आहे. मोदींशी त्यांना ओबामा यांनी दिलेल्या सल्ल्यावर चर्चा झाली नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिका सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या भूमिकेचा ज्यो बायडेन प्रशासन आदरच करते. अमेरिकेतील अन्य कोणाही नागरिकाप्रमाणे तेही या देशाचे एक नागरिक आहेत. तथापि, ओबामांच्या विधानावरून बायडेन आणि मोदी यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. बायडेन यांनी मोदी यांच्याशी सगळ्याच विषयांवर चर्चा केली आणि मोदी यांनीही सर्वच प्रकारचे मुद्दे उपस्थित केले आणि हे अत्यंत सन्मानपूर्वक असेच झाले.
काय म्हणाले होते ओबामा?
जर अमेरिकेचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी यांना भेटले तर त्यांनी मोदींना भारतातील अल्पसंख्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले पाहिजे. मी आणि मोदी परस्परांना चांगले ओळखतो. माझी आणि त्यांची चर्चा झाली असती तर मी त्यांना हेच सांगितले असते की, जर तुम्ही भारतातील अल्पसंख्यांचे रक्षण केले नाही तर एक वेळ अशी येईल की भारत विघटीत होण्यास सुरूवात होईल. अंतर्गत कलह सुरू झाल्यावर काय होते ते आम्ही पाहिले आहे. हा केवळ मुसलमानांच्या भारतासाठी नाही तर हिंदूंच्या भारतासाठीही चिंतेचा विषय असेल असे ओबामा एका मुलाखतीत म्हणाले होते.