मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार सहा जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा एक अब्ज डॉलरने कमी होऊन 561 अब्ज डॉलरवर आला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात परकीय चलन साठा 44 दशलक्ष डॉलरने वाढला होता.
मात्र या आठवड्यात या साठ्यात घट झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये भारताकडील परकीय चलन साठा 645 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. त्यानंतर अमेरिकेत महागाई वाढवून व्याजदर वाढ करण्यास सुरुवात झाली.
त्याचबरोबर रशियाने युक्रेन वर हल्ला केला. या कारणामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला. विशेषतः खनिज तेलाच्या किमती वाढल्या. भारत आपल्या गरजेच्या 85% खनिज तेल आयात करतो. भारताला इतर आयात महागात पडली. या कारणामुळे डॉलर वेगाने खर्च होत आहेत. अशा परिस्थितीत भारताकडील परकीय चलन साठा कमी होत असल्याचे सांगण्यात आले.
रिझर्व्ह बॅंकेने या बाबीची गंभीर दखल घेतली असून परकीय चलन साठा वाढावा यासाठी सहा महिन्यात अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्यामुळे परकीय चलन साठ्यातील घट मंदावली असली तरी अजूनही काही प्रमाणात परकीय चलन साठा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
रुपयाच्या माध्यामातून व्यवहार
अर्थ मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार भारतातील आयात आणि निर्यात करणाऱ्यांनी विविध देशाबरोबर रुपयाच्या माध्यमातून आयात आणि निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया, बांगलादेश, श्रीलंकेबरोबर असा व्यापार सुरू झाला असून इतर देशाबरोबर रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने अनिवासी भारतीयांना भारतात डॉलरच्या माध्यमातून ठेवी ठेवण्याचे आवाहन केले असून या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.