नवी दिल्ली – ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहचला आहे. तो आता केवळ 524 अब्ज डॉलर्स इतकाच राहिला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हा साठा पुन्हा 3.85 अब्ज डॉलर्सने कमी झाला आहे. 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाचा परकीय चलन साठा 528.367 अब्ज होता, असे आरबीआयच्या आकडेवारीनुसार दिसून आले.
ताज्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 247 दशलक्ष डॉलर्सने घसरून 37.206 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.वाढत्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेल्या रुपयाचे रक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बाजारात हस्तक्षेप केल्यामुळे परकीय चलन साठा काही महिन्यांपासून घसरत आहे. तसेच, आयात केलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळेही या साठ्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात, रुपयाने इतिहासात प्रथमच 83 चा अंक ओलांडला.
या वर्षी आतापर्यंत रुपयाचे सुमारे 10-12 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. रशियाने फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युक्रेनवर आक्रमण केले तेव्हापासून भारताच्या परकीय चलन साठ्यात सुमारे 100 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे जेव्हा जागतिक स्तरावर ऊर्जा आणि इतर वस्तूंची आयात महाग झाली होती.