पुणे – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तरुणीच्या आत्महत्येनंतर तिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले होते. अशातच आता भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणासंदर्भात पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन सत्य बाहेर काढले पाहिजे अशी मागणी केली. त्याचप्रमाणे हे प्रकरण दाबण्याचं काम पुणे पोलिसांनी करु नये असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गेल्या चार वर्षातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पुणे महापालिकेला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना तरुणीच्या आत्महत्येसंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्याचे नाव घेतलं जात असल्याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
पूजा लहू चव्हाण (वय 22,मुळ रा.बीड ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु, तिने आत्महत्या का केली अद्याप स्पष्ट झाले नाही.