पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत पंतप्रधानांचे मार्गदर्शन
पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. “देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,’ असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सुरक्षाविषयक विविध बाबींवर प्रकाश टाकला.
पाषाण रस्त्यावरील “आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात देशांतर्गत सुरक्षेवर तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. शनिवारी पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील पोलीस महासंचालक तसेच तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानातील बदल, त्याअनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदी बोलत होते.
सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्यआक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी होईल. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी आहेत.
मोदींनी घेतला अधिकाऱ्यांचा “योगा क्लास’
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार पाहण्याबरोबरच आपल्या “फिटनेस’लाही तितकेच महत्त्व देतात. देशातील कोणत्याही राज्यात किंवा परदेश दौऱ्यातही ते योगा व व्यायाम करण्यास विसरत नाहीत. ते सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे योगा, ध्यानधारणा व हलकासा व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. यावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही योगासने केली. मोदी यांनी अधिकाऱ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
निरोगी आयुष्यामध्ये योगाचे सर्वाधिक महत्त्व असल्याचे त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगत ते देश-विदेशामध्ये योगाचा प्रचार व प्रसारही करतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त त्यांना देश-परदेशात दौरे करावे लागतात. कुठेही गेले तरीही न चुकता ते योगा, ध्यानधारणा, व्यायाम करण्यावर भर देत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी योगाला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याचेही प्रयत्न केले. यामुळे जागतिक योगादिनही साजरा केला जातो.