मुंबई – राज्यात आज ठिकठिकाणी दूध आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यात उळे इथे आंदोलकांनी जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदवला.
अंबाड इथे, दूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही एका डेअरीने दूध खरेदी केल्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर इथे ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली.
लातूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दूध आंदोलनाचा भाग म्हणून तांदुळजा इथल्या ग्रामदैवतेला दुधाचा अभिषेक करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दगडाला दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आले. बुलडाणा शहरात दुधाने अंघोळ करून तसेच गोरगरिबांना दुधाचे वाटप करुन आंदोलन करण्यात आले.
सांगली जिल्ह्यात, येलूर फाटा व डिग्रज अशा दोन ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन केले. पुणे – बंगळुरू महामार्गावर आज पहाटे आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टॅंकर अडवून दूध रस्त्यावर ओतले. डिग्रज फाटा इथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजारामबापू दूध संघाचा दूध टॅंकर अडवून रस्त्यावर दूध ओतले.