आळंदी -आळंदी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सातजण आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय, विनाकारण पोलीस ठाण्यामध्ये येवू नये, असा फलकच पोलीस ठाण्याबाहेर लावण्यात आला आहे.
आळंदी शहर व परिसरातील 10 जणांचा करोना अहवाल बुधवारी (दि. 1) पॉझिटिव्ह आल्याची माहिती आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. यात पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी, तीन कर्मचारी तर देहू फाटा परिसरातील 4 जणांचा समावेश आहे.
आळंदी पोलीस ठाण्यामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दोन दिवसांपूवी करोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील 17 जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. त्यापैकी 6 जण पॉझिटिव्ह तर 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, बुधवारी पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची लागण झाली असली तरी यातील दोघेच खेड तालुक्यात मोजले गेले असून इतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत पकडले आहे.