कनिष्ठ महाविद्यालयांची आजपासून नोंदणी
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 15 जुलैपासून सुविधा उपलब्ध
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी गुरुवारपासून संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 15 जुलैपासून सुविधा उपलब्ध होणार आहे.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी केलेला आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव तथा पुणे विभागीय सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी (दि.1) जारी केले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगून प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे. कोणत्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी दि. 2 ते 15 जुलै अशी मुदत देण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी नोंदवलेली माहिती तपासणी करून ऑनलाइनद्वारे अंतिम करण्यासाठी 2 ते 16 जुलै या कालावधीत विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे व अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी 15 जुलैपासून ते दहावीचा निकाल लागेपर्यंत संधी मिळणार आहे.
माहिती ऍप्रूव्ह करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे व अर्ज ऍप्रूव्ह झाला आहे याची खात्रीही याच कालावधीत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती ऑनलाइन तपासण्यासाठी 16 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-2 नोंदविणे व सबमिट करण्यासाठी दहावीच्या ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यापासून सुरुवात करता येणार आहे.
प्रवेशासाठी सूचना
– शाळांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करता येणार
– माहिती पुस्तिका छापील स्वरूपात मिळणार नाही
– ऑनलाइन नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांना लॉग-इन आयडी व पासवर्ड मिळणार
– शाळास्तरावरून अर्ज ऍप्रूव्ह करण्याची कार्यवाहीही ऑनलाइनद्वारे होणार
– प्रवेशअर्ज ऑनलाइनद्वारेच जमा करावे लागणार
– मुख्याध्यापक व तंत्रसहायक यांचे प्रशिक्षण होणार
– विद्यार्थी व पालकांसाठी उद्बोधन वर्ग घेण्याचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर होणार
– विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग-1 ऍप्रूव्ह करण्याची जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळांची राहणार
– राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांच्या अर्जाचा भाग ऍप्रूव्ह करण्याची जबाबदारी मार्गदर्शन केंद्रावर
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ
https://pune.11th admission.org.in/