बलिया – मुस्लीम मतांसाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे मुस्लीम धर्मात धर्मांतरही करू शकतात असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशचे एक मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी केले आहे.
अखिलेश यांना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर यंत्रणेचे पाठबळ आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. कदाचित त्यांना पाकिस्तानकडून आर्थिक मदतही मिळत असावी, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवली आहे.
शुक्ला यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व इस्लामिक जगतापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे येथील इस्लाम धर्मीयांनी अखिलेश यादव यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे.
त्यांना आयएसआयकडून संरक्षण आणि सल्ला मिळत आहे. अखिलेश यादव यांनी रविवारी हरडोई येथे एका जाहीर सभेत पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बरोबरीनेच बॅरिस्टर महंमद अलि जीना यांनीही स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शुक्ला यांनी वरील विधाने केली आहेत.
मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी अखिलेश यादव हे नमाज पडतात आणि ते रोजाही ठेवतात, असेही त्यांनी म्हटले आहे. आयएसआयच्या सांगण्यावरूनच अखिलेश यादव हे जीनांचे कौतुक करीत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे.