पुणे (प्रतिनिधी) – ‘सीआयडी’ मालिका पाहून त्यामधील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी सिंहगड रस्त्यावरील ज्येष्ठ महिलेचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दोघांनी टी.व्ही. पाहत बसलेल्या महिलेल्या पाठीमागून धक्का देत खाली पाडले. यानंतर महिलेचे तोंड, नाक दाबून तिचा खून करून घरातील ऐवज चोरून पसार झाले होते. घटनास्थळी बोटांची ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हॅण्डग्लोज घातलेले होते. सिंहगड पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे खूर्द मधील सायली हाईट्स याठिकाणी 30 ऑक्टोंबर रोजी ज्येष्ठ महिलेचा खून करून घरातील सोने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. शालीनी बबन सोनवणे ( वय 70 ,रा. सायली हाईटस हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्यासह तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता.
घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तसेच, प्रत्यक्षदर्शी नसल्याने घटनेचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपास सुरू होता. या दरम्यान मंगळवारी (दि.2) तपास पथकातील पोलीस अंमलदार उज्जव मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिरा येथील लहान मुलांकडुन माहिती मिळाली की, 30 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. यावरून पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले.
यामध्ये दोन मुले अत्यंत घाई गडबडीत निघून जात असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली. त्यावेळी दोन्ही मुलांनी चेहऱ्यावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता यातील एका मुलाला स्वःतच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.