पुणे – पुणे शहरात आणि परिसरात पोटनिवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कॉंग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले.
तर, दुरीकडे भाजपाने पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मात्र, अश्यातच पुण्यात आणखी एक मोठी घटना घडल्याचं समोर आलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुण्यातील नातेवाईकांच्या घरात चोरी झाली असून, यात चोरटयांनी घरातील पिस्तूल पळवली आहे. या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, पुण्यातल्या औंध परिसरात ही घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही चोरी झाली आहे. याबद्दल शहरातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.