रेडा – माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, या बहिण-भावाने महामारीच्या संकटात कित्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवून जनतेच्या सुख, दुःखात सहभागी होत इंदापूर तालुक्यात खऱ्या अर्थाने भाजपचा जनाधार वाढविण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे तरूणांची फळी एकवटली असल्याने भाजपाला भविष्यात लाभ होणार आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने कार्यरत आहेत. एक दूध संघ, इंदापूर पंचायत समिती, इंदापूर नगरपालिका अशा मोठ्या संस्था ताब्यात आहेत. तरीदेखील पाटील परिवाराने जनतेशी असणारी नाळ कधीही तोडलेली नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांच्याकडून बावडा – लाखेवाडी गटातील सर्व गावांतील नागरिकांबरोबर रोज संपर्क ठेवला जात आहेत. जिल्हा परिषदेच्या गटातील कोणत्याही गावात नागरिकांना अडचण राहू नये, म्हणून सातत्याने संपर्क व अडचणी सोडवण्यासाठी यंत्रणा पाटील यांनी चोख राबवली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची कामे जलद गतीने मार्गी लागत आहेत.
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पहिल्यांदा राजकारणात एंट्री केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन हे साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारातील बारकावे आणि अभ्यास करीत आहेत, शेतकरी केंद्रबिंदू मानून कारखाना कार्यक्षेत्रातील व बाहेरील गेटकेन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देत आहेत. राजवर्धन पाटील हे साखर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामाचे नियोजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन करीत आहेत. तालुक्यातील सर्व छोटे-मोठे कार्यक्रम व सुख, दुःखाच्या कार्यक्रमात राजवर्धन व अंकिता पाटील आवर्जून हजेरी लावत आहेत.
बहिण-भावाच्या जोडीने तालुक्यात भाजपाला मोठा जनाधार देण्याची भूमिका कामातून दिली आहे. माजी मंत्री पाटील यांची कन्या व पुत्र असल्याचा मोठेपणा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळणे, गोरगरिबांच्या समस्या सोडवणे, युवकांचे अभिष्टचिंतन करणे, आदी विविध उपक्रम राबवित असल्यामुळे तालुक्यातील जनतेशी त्यांची नाळ जुळली आहे. राजवर्धन पाटील हे थोरामोठ्यांचा आशीर्वाद, युवकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत असल्यामुळे नव्या दमाच्या तरूण कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार झाले आहे. याचा फायदा भविष्यात भाजपला होणार, हे मात्र निश्चित.
जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी जिल्ह्याबरोबर संपूर्ण राज्यामध्ये तरुण सदस्या, अशी ओळख आहे. होमपीचवर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या काम करीत आहेत. सर्व गावातील विकासकामांना न्याय देण्याची भूमिका सांभाळत आहेत. साखर उद्योग विश्वातील इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा)वर संचालक म्हणून काम करीत आहेत. कृषी क्षेत्रात नवनवीन अध्यापन तंत्रज्ञानाकडेही लक्ष देतात. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष म्हणून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत अद्ययावत शिक्षणप्रणाली राबवण्यावर भर देत आहेत. त्यांनी अल्पावधीतच शैक्षणिक, कृषी क्षेत्रात ठसा उमटविला आहे.