अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत – मुख्यमंत्री

पुणे – “विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचे जीव धोक्‍यात घालता कामा नये. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत,’ अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

“विद्यार्थ्यांना सरासरी मार्क्‍स देऊन (ऍग्रिगेट) उत्तीर्ण करण्यात यावे. करोनामुळे किती काळ असे राहणार, याचे उत्तर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य किती काळ टांगून ठेवणार, यासाठी देशपातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची आवश्‍यकता आहे,’ असे ठाकरे यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी मंगळवारी महाराष्ट्र, गुजरात, पश्‍चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत करोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधानांशी पदवी परीक्षांच्या तिढ्याविषयी चर्चा केली.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्‍यकता असून विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार, मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर करोना युद्धात त्यांच्या इच्छेनुसार मदत घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.