वॉशिंग्टन – जागतिक बॅंकेने गेल्या पंधरा महिन्यात कोविडशी संबंधीत मदतीवर तब्बल 157 अब्ज डॉलर्सचा निधी अदा केला आहे. या बॅंकेकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्य, अर्थकारण आणि सामाजिक क्षेत्रासाठी बॅंकेकडून हा निधी पुरवठा करण्यात आला आहे.
करोना महामारीच्या अभुतपुर्व पेचप्रसंगावर जागतिक बॅंकेने ही अभुतपुर्व आर्थिक पुरवठ्याची कामगिरी केली आहे असे या बॅंकेने म्हटले आहे. बॅंकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपास यांनी या संबंधात म्हटले आहे की, अजून महामारीचा काळ संपलेला नाही त्यामुळे आम्ही विकसनशील देशांना यापुढील काळातही मदत करीत राहणार आहोत.
विकसनशील देशांमध्ये अजूनही लसींचा मोठा तुटवडा आहे, ही आमच्यासाठी अधिक चिंतेची बाब आहे. लसींच्या अभावी मानवी जीव गमावण्याची वेळ येणे ही दुर्देवी स्थिती आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे.
जागतिक बॅंकेने या काळात गरीब देशांना बऱ्याचवेळा अनुदान स्वरूपात किंवा शुन्य टक्के व्याज दराने निधी दिला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. अशा स्वरूपात देण्यात आलेली ही रक्कम 53.3 अब्ज डॉलर्स इतकी आहे.