सातारा -खिंडवाडी येथे सातारा कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल व उपबाजार या वास्तूची उभारणी होत असून ही जागा कायदेशीररित्या बाजार समितीच्या मालकीची आहे. बाजार समितीच्या या नवीन कामाचे भूमिपूजन विधिवत केले असून लवकरच बाजार समितीचे काम पूर्ण केले जाईल, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. सातारच्या विकासात आडवे पडण्याचे काम खासदार उदयनराजे नेहमीच करत असतात. सवयीप्रमाणे आजही त्यांनी विकासकामात अडथळा आणला असून अडथळा आणणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
सातारा बाजार समितीची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पॅनेलने विजय मिळवला. शहरातील बाजार समितीची जागा पुरेशी नसल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बाजार समिती खिंडवाडी येथील जागेत हलवण्याचा निर्णय बाजार समितीने यापूर्वीच घेतला होता. खिंडवाडी येथील जागा कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीने मिळवली आहे.
त्यामुळे बाजार समितीच्या मालकीच्या जागेवर सुसज्ज वास्तू उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उदयनराजे यांनी आज बाजार समितीच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही या कामाचे विधिवत भूमिपूजन केले आहे आणि लवकरच हे काम पूर्ण करू, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.