पुणे – जमीन, सदनिका अथवा दुकाने आदींचे जुने दस्तऐवज शोधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने “ई-सर्च’ ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. आता यापुढे जाऊन दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होताच, ते लगेच “ई-सर्च’ प्रणालीमध्ये अपलोड केले जात आहे. त्यामुळे संबंधित मालमत्तेचा मालक कोण, मालमत्तेचा व्यवहार कधी झाला याची माहिती नागरिकांना तत्काळ घरबसल्या मिळत आहे. यामुळे जमीन, सदनिकेच्या खरेदी-विक्रीतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत झाली आहे.
कोठे पाहता येतील जुने दस्त
मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
फसवणूक टळण्यास मदत
एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. ई-सर्च प्रणालीमुळे सामान्य खरेदीदाराची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे.
- ई-सर्च सुविधेचे फायदे
- दस्त क्रमांकानुसार अथवा मिळकत क्रमांकानुसार
- मालमत्ता शोधण्याची सुविधा
- ऑनलाइन सर्च
- दस्त शोधण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये
- जाण्याची गरज नाही
- प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा
…अशी मिळते माहिती
“ई-सर्च’ प्रणालीमध्ये सन 2002 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहेत. www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ई-सर्च प्रणालीवर जमिनीच्या सर्व्हे नंबर अथवा गट नंबरनुसार त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डच्या नंबरनुसारही मालमत्तेची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे काम सोपे झाले आहे.
ई-सर्च ही सुविधा नागरिकांना फायदेशीर ठरत आहे. या सुविधेमुळे कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने जागेचा मालकी हक्क तपासला जातो. यामुळे वेळेची बचत होते. संबंधित मिळकतीच्या मालकी हक्काचा पूर्वइतिहास नागरिकांना या प्रणालीमध्ये उपलब्ध होत आहे, असे कायदे सल्लागार ऍड. युवराज खाटपे म्हणाले.