नगर -करोनाच्या संकटाने राज्यातील नाभिक समाज मोठ्याच अर्थिक संकटात सापडला आहे. साधारण साडेचार महिन्यांपासून या समाजाचा व्यवसायच ठप्प आहे. अशाकाळात आपल्याच एका बांधवावर जळीताचे संकट कोसळले. या संकटात महामंडळ पाठिशी उभे राहिले. लोकवर्गणीतून सलून उभे केले.
महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाच्या लोकवर्गणीतून नगर शहरातील कायनेटीक चौकात उभ्या केलेल्या सलून दुकानाचे आज आमदार जगताप व दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, महाराष्ट्र प्रदेश सचिव विकास मदने, महाराष्ट्र ऊत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, नगर शहर सलून संघटनेचे अध्यक्ष जनार्दन वाघ, उत्तर विभागीय संघटक शिवाजी दळवी, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहर उपाध्यक्ष बापू क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष नवनाथ भाऊ मदने, विशाल मदने, संजय मदने, सुरेश राऊत, मनोज शिंदे, प्रमोद शेजुळ, किशोर मोरे, अनिल कदम यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकऱ्यांनी आज हजेरी लावली.
आमदार जगताप म्हणाले, “”स्वत:च करोनासारख्या संकटात असताना महामंडळातील सदस्यांनी नीलेश शिंदे यांना मदत करण्याची तयारी दर्शविली, हीच मुळात खूप मोठी समाधानाची बाब आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष शांतराम राऊत यांनी घेतलेली भूमिका महत्वाची ठरली. भविष्यातही महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाच्या मागण्या शासन दरबारी सोडविण्यासाठी आग्रह धरु.”
दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. सहकाऱ्यांनी साथ दिल्यास व्यावसायिकांना नव्याने पुन्हा उभे राहण्याचे मानसिक बळ मिळते. त्यामुळे भविष्यात अशीच एकमेकांना साथ देण्याची भूमिका सर्वानीच घ्यायला हवी. तसेच ज्यांना मदत झाली. त्यांनी विशेष करुन इतरांना हात देण्याचे काम करावे, असे ते म्हणाले. जिल्हाध्यक्ष शांतराम राऊत यांनी प्रास्तविक केले.
नगरमध्ये आज एका सलून व्यावसायिकाचे दूकान उभे राहिले. मात्र, नाभिक समाज महामंडळाच्या अनेक मागण्या अजून शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आ. जगताप यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी आ. जगताप यांच्याकडे केली. अहमदनगर शहर सलून संघटनेचे अध्यक्ष जनार्दन वाघ यांनी आभार मानले.