सासवडमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर उभारले शेडनेट
सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यासह सासवड शहरात करोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण भयभीत आहे. तर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण विभागालाच शेटनेटचे कवचकुंडले लावण्यात आले आहे.
सासवड ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी विभाग पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे. पण ओपीडी आणि शिक्षण विभागाचा रस्ता एकच असल्याने जो-तो शिक्षण विभागात येऊन चौकशी करीत आहे.
दरम्यान, कामानिमित्त अनेक शिक्षक दररोज ये-जा करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांना संसर्गाचा धोका निर्माण झाला होता.
तपासणीसाठी येणाऱ्यांचा थेट संपर्क टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक होत्या. त्यामुळे सिंगापूर जिल्हा परिषद शाळेतील पंढरीनाथ काळे यांनी तात्काळ शेडनेट, बांबूचे बेट तोडून बांबूची उपलब्धता करून दिली. तर किल्लारीचे महादू क्षीरसागर, परभणीचे काशीनाथ मांडे यांनी दोन दिवस वेळ देऊन सर्वेक्षणाचे काम सांभाळून शिक्षण विभागाला समोरच्या बाजूला शेडनेट बनवून दिले, असे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच ये-जा करण्यासाठी भर टाकून रस्ता करून दिला असल्याने शिक्षण विभाग काही अंशी का होईना सुरक्षित झाला असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.