टेंभू योजनेचे पाणी जिल्ह्याला द्यावे

प्रकल्पग्रस्तांची मागणी; जागेवरच 450 तक्रारींचे निवारण 

सातारा – आरक्षित असणारे टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्याला द्यावे, 20 वर्ष रखडलेल्या उरमोडी डावा कालव्याचे काम पूर्ण करण्यात यावे, वसना-वांगना योजनामधून पिण्याच्या पाणी देण्यात यावे आदी मागण्या आज झालेल्या तक्रार निवारण परिषदेत करण्यात आल्या. दरम्यान जागेवरच 450 तक्रारींचे निवारण करण्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना यश आले.

सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील लाभधारक आणि पाणी परवानाधारक व सिंचन प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास संदर्भात कृष्णानगर येथील करमणूक केंद्रामध्ये तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, शाखा अभियंता शशिकांत गायकवाड, पी. डी. जाधव, संजय बोडके, प्रवीण चावरे, सहाय्यक अभियंता अभय काटकर यावेळी उपस्थित होते.
उरमोडीच्या डाव्या कालव्याचा नकाशा मागूनही दिला जात नाही. जो नकाशा दिला आहे, त्यात काहीही स्पष्ट होत नाही. उरमोडीच्या डाव्या कालव्याचे काम 20 वर्षापासून रखडले आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. याबाबत विद्यमान आमदारांना सांगितले असता त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. उरमोडी डाव्या कालव्यापासून अतीतचे क्षेत्र वंचित राहिले आहे. त्यामुळे त्या परिसरात पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळत नाही अशी व्यथा एका शेतकऱ्याने मांडली. टेंभू योजनेमध्ये सातारा जिल्ह्यासाठी पाणी आरक्षित असतानाही ते पाणी दिले जात नाही.

सातारा जिल्ह्यासाठी पाणी मागितले असता टेंभूमध्ये सातारा जिल्ह्यासाठी पाणी आरक्षित नसल्याचे सांगण्यात येते, याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी आमदार बाबुराव माने म्हणाले, शेतीचे, पाण्याचे प्रश्‍न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वर्षानुवर्ष हे प्रश्‍न सुटत नाहीत. निवेदने दिली तर त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. मात्र काळ आता बदलला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. वसना-वांगना योजनेमधून पिण्यासाठी शेतीसाठी पाणी मिळत नाही, ते पाणी कसे उपलब्ध होईल यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे.

नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार लोकाभिमुख व्हावा यासाठी आजच्या तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ 8 जिल्ह्यात काम करीत असून सातारा जिल्ह्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहेत, त्या कामांनी आता वेग घेतला आहे. सर्व अधिकाऱ्यांना काम करायचे असते मात्र काम करताना काही त्रुटी राहून जातात. बऱ्याचदा पाण्याची आवर्तने मिळत नाहीत, अशा तक्रारी येतात. ज्या काही अडचणी असतील त्यांचे निराकरण व्हावे यासाठी मी व महामंडळाचे अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत असून आज घेतलेल्या परिषदेमध्ये 450 तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले आहे. 80 ते 85 अर्ज निकालात काढण्यात यश आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.