पालकमंत्रीपद पुण्याचे ; कानोसा साताऱ्याचा

भाजप सरसावली पण, सेनेचाही आग्रह

प्रत्येकी 135 जागा व मित्रपक्षांना 18 असा भाजपने दिलेला फॉर्म्युला सेनेने अमान्य केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सेनेला दत्तक गेलेल्या नरेंद्र पाटील यांच्या प्रचारात सेनेची व भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची नाळ जुळली नाही. जावली, महाबळेश्‍वर, सातारा येथील सेनेची ताकद प्रचारात दिसली नाही. भाजपची एकगठ्ठा ताकद साताऱ्यात दिसली. वाई व सातारा जावली विधानसभा मतदारसंघावर नजर ठेवूनच दादा साताऱ्याचा कानोसा घेत आहेत. त्यामुळे माण खटाव व फलटण या विधानसभा मतदारसंघाचा गुंता अजून दादांनी हातात घेतलेला नाही. आधी इनकमिंग आणि अंर्तगत बांधणी, बूथ लेवलचा अहवाल आणि कार्यकर्त्याची मते यांची सांगड घालण्याचे काम पुण्याच्या पालकमंत्र्याकडून सुरू आहे. बारामतीला धक्का देण्यासाठी साताऱ्यात पडझड घडवायची हे समीकरण पक्के ठरले आहे.

सातारा कोल्हापूर ते पुणे या परिक्षेत्रीय विभागात युतीच्या राजकारणाचा रिमोट हातात ठेवणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पवारांच्या बारामतीवर लक्ष ठेवण्यासाठी दादांची नेमणूक झाली असली तरी पवारांची पाठराखण करणाऱ्या साताऱ्याचा कानोसा घेऊन राजकीय बेरजा करणे चंद्रकांतदादांचे काम थांबलेले नाही.

लोकसभा निवडणुकांमध्ये युतीचा राजकीय अवकाश चंद्रकांतदादांनी आपल्या अचूक निर्णयांनी भरून काढला. साताऱ्यात राजेशाहीचे वजन लक्षात घेऊन दादांनी कधी कोल्हापुरातून तर कधी कराडातून राजकीय सूत्रे हलविली. अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा किंवा कोल्हापुरात युतीचा नारळ फोडण्याचे नियोजन या सर्वच राजकीय हालचालींवर दादांनी आपली स्वतंत्र छाप सोडली आहे. आता पुण्याचे पालकमंत्री पद चंद्रकांतदादांकडे देण्यात आले असले तरी दादांचे बारीक लक्ष बारामतीवर आहे.

नीरा देवधर धरणाच्या पाणीप्रश्‍नावर राष्ट्रवादीची झालेली राजकीय कोंडी आणि शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची झालेली भेट यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात राजकीय काहिली सुरू झाली आहे. दादांनी पुणे सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचे शेड्युल्ड बनवले असून मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर येत्या 22 जूनपासून राजकीय मोट बांधण्याचे प्रयत्न गतिमान होणार आहे. सातारा व पुणे जिल्ह्याची प्रादेशिक सलगता व शरद पवार हा समान राजकीय संदर्भ यामुळेच चंद्रकांतदादांनी लोकसभेचा किंचित श्‍वास घेत विधानसभा निवडणुकांच्या बांधणीला वेग देण्याचे निश्‍चित केल्याचे वृत्त आहे.

साताऱ्यासाठी शिवसेना आग्रही असून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी राजकीय खेळी करत भाजपला बॅकफूटला ठेवले. जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत भाजप सदस्य पालकमंत्री शिवतारे यांनी डावलल्याने युतीमध्ये अंर्तगत वादाची भांडी वाजू लागली आहेत. शिवतारे यांनी आराखडा समितीत आमदार शंभूराज देसाई, सेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, रणजितसिंह देशमुख व राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची वर्णी लावत भाजपला बरोबर बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याची गंभीर दखल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने घेतल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.