“जिहे-कठापूर’चे पाणी माण-खटावला मिळवून देणार : विजय शिवतारे

मायणी -आपण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना खटाव-माण या दुष्काळी तालुक्‍यांना जिहे-कठापूर या योजनेअंतर्गत पाणी मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून सदर काम पूर्णत्वाकडे आणले होते. मी मंत्री पदावर असतो तर सदर काम यापूर्वी डिसेंबरमध्येच पूर्ण केले असते. मात्र मंत्रिपदावर नसलो तरीदेखील येत्या चार ते पाच महिन्यात जिहे-कठापूर योजनेचे पाणी कोणत्याही परिस्थितीत माण-खटावला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. खटाव-माण प्रो. ऍग्रो लिमिटेड पडळ (ता. खटाव) या साखर कारखान्यास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

विजय शिवतारे म्हणाले, पडळ येथे येण्यापूर्वी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन सदर कामाची माहिती घेतली. आपण आजजरी मंत्री पदावर नसलो तरी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे हे काम पूर्ण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. येत्या चार ते पाच महिन्यात जिहे-कठापूर योजनेतून कोणत्याही परिस्थितीत नेर तलावात पाणी आणण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्नशील आहोत. नेर ते आंधळी या सतराशे मीटरच्या अपूर्ण बोगद्याचे काम देखील येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच माण तालुक्‍यामध्येदेखील या योजनेतून पाणी उपलब्ध होणार आहे.

यावेळी कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, विजय शिवतारे मंत्रीपदावर असताना या योजनेच्या संदर्भात माझ्याशी ते सातत्याने संपर्कात होते. त्यांनी यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. नेवासा तालुक्‍यात उसाचे भरपूर प्रमाणात क्षेत्र आहे. त्यामुळे तेथे नवीन साखर कारखाना सुरू करण्याचा आपला मानस आहे. पडळ येथील कारखाना अल्पावधीतच अनंत अडचणींना तोंड देत सुरू करून आज महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये अव्वल स्थान निर्माण केले आहे.

त्यासाठी त्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आपण पडळ येथे आलो असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, संचालक विक्रम घोरपडे व महेश घार्गे, जनरल मॅनेजर अशोक नलावडे, प्रशासकीय अधिकारी अमोल पाटील, त्याच प्रमाणे विजय शिवतारे यांच्या सुकन्या देखील उपस्थित होत्या. कारखान्याच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.