धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे पालन करावे

सातारा  -प्रार्थना स्थळे, धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. ही स्थळे खुली झाल्याने गर्दी होत आहे. ही गर्दी होणार नाही आणि तेथे मास्क, सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होण्याची दक्षता देवस्थानचे प्रमुख वा विश्‍वस्तांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

शासनाने धार्मिक स्थळे खुली केली आहेत; परंतु काही धार्मिक स्थळांमध्ये शासनाच्या सूचनांचे पालन केले जात नाही. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही आणि धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर राखले जावे, धार्मिक स्थळांचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित विश्‍वस मंडळ, प्रमुखांची आहे. पाहिजे. धार्मिक स्थळांमधून करोनाचा संसर्ग वाढू नये, हा प्रशासनाचा हेतू आहे. धार्मिक स्थळांमध्ये नियमांचे पालन करावे, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.

शाळाप्रमुखांनी दक्षता घ्यावी
राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोमवार, दि. 23 पासून जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांवर उपचार सुरू आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेले शिक्षक व कर्मचारी शाळांमध्ये हजर झाले आहेत. विद्यार्थ्यांनीही शासनाचे नियम पाळले पाहिजेत. मास्कचा योग्य वापर, शाळांमध्ये गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे आदी दक्षता घेतली पाहिजे.

सध्या तरी करोनावर औषध नसून नियमांचे तंतोतंत पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. शाळाप्रमुखांनीही शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन वर्ग खोल्या, स्वच्छतागृहांचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. सर्व विद्यार्थी व शिक्षक मास्कचा वापर करतील, याची जबाबदारी संबंधित शाळेची आहे. आजारी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये. पूर्ण बरे झाल्यावर शाळेत जावे, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.