बीजिंग- चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या युद्धखोरीमुळे जागतिक पातळीवर चीन टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. परिणामी शी जिनपिंग यांना आता फार काळ राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार नाही, असे ठोकताळे जागतिक पातळीवर बांधले जात आहेत.
तैवानाच्या सागरी आणि हवाई हद्दीतील घुसखोरी, मानवी हक्कल्लांचे उल्लंघन आणि इतर अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी जी 7 परिषदेने नुकतेच शी जिनपिंग यांना बोलावले होते. त्याच आठवड्यात चीन सरकारने सामाजिक कार्यकर्ते जोशुआ वॉंग यांच्या कारावासाच्या शिक्षेत आणखी 10 महिन्यांनी वाढ केली. त्याचेवळी चीनने ऑस्ट्रेलियाशीही वाद उकरून काढला आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची मानसिकता शीतयुद्ध खेळण्याची आहे. या वैचारिक मतदभेदांमुळे जिनपिंग यांनी ऐनवेळी चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारी मंत्र्यांच्या पातळीवरील आर्थिक बैठक रद्द केली होती.
गेल्या काही काळात चीनच्या आक्रमक धोरणामुळे दक्षिण आशियातील शेजारी देशांशीही चीनचे हितसंबंध बिघडताना दिसत आहेत. मध्यंतरी दक्षिण कोरियाने त्यांच्या देशातील सर्वाधिक उंचावर असणाऱ्या लष्करी क्षेत्रात अमेरिकन शिष्टमंडळाला प्रवेश दिला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा विकत घेतली होती. तेव्हापासून चीन आणि दक्षिण कोरियातील संवाद बिघडला आहे.
याशिवाय, अमेरिका आणि चीनमधील व्यापारीयुद्धामुळेही शी जिनपिंग यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे. हॉंगकॉंग, तैवान आणि भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादामुळेही जिनपिंग टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. या सगळ्या बाबी पाहता शी जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत.