नवी दिल्ली – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने करोनावर मात केली असून त्याला दिल्लीच्या एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. छोटा राजन याला तिहार जेल नंबर 2 मध्ये कडेकोट सुरक्ष्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. 22 एप्रिल रोजी छोटा राजनची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
प्रकृती बिघडल्यामुळे 25 एप्रिल रोजी त्याला दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी छोटा राजन याच्या मृत्यूची अफवा पसरली होती. पण ती खोटी असल्याचे काही वेळातच समोर आले होते. छोटा राजन याचा करोनामुळे मृत्यू झाला ही बातमी खोटी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आले होते. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गॅंगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बहल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचे शत्रुत्व निर्माण झाले व राजनने स्वत:ची टोळी उभी केली.