Lockdown : ‘जादा करोना बाधित आढळल्यास, सहा आठवडे लॉकडाऊन’

नवी दिल्ली  – ज्या जिल्ह्यांमध्ये संसर्ग दर 10 टक्‍क्‍यापेक्षा अधिक आहे, तेथील लॉकडाऊन आणखी सहा ते आठ आठवड्यांनी वाढवण्याची गरज असल्याचे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्‍त केले. आज देशातील 718 जिल्ह्यांपैकी तीन चतुर्थांश जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. त्यात मुंबई, दिल्ली, बंगळुरू यांसारख्या महानगरांचा समावेश आहे.

जिथे पॉझिटिव्हिटी दर खूप जास्त आहे तिथे बंद ठेवले पाहिजे. तेथे हा दर 10 टक्‍क्‍यांवर आला की तो भाग खुला करता येईल. पण तसे व्हायला हवे. मात्र, ही गोष्ट सहा ते आठ आठवड्यात होत नाही असे ते म्हणाले. देशाच्या राजधानीत पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्‍क्‍यावर पोहोचला होता. मात्र, आता तो 17 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. जर दिल्ली उद्या खुली केली तर तेथे हाहाहकार माजेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

या निमित्ताने भार्गव यांच्या रूपाने प्रथमच एका सरकारी अधिकाऱ्याने लॉकडाऊन किती काळ असावे याचे मार्गदर्शन केले आहे. अनेक राज्यांची अर्थचक्राची गती लॉकडाऊनमुळे बंद आहे. अनेक राज्यांनी नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत. तरीही करोनाची वाढ अद्याप कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असल्याचे सांगत लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. त्यांनी लॉकडाऊनचा देशाचा आर्थिक चक्रावर परिणाम होत असल्याचे सांगत त्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला होता. अनेक राज्यांनी त्यानंतर अनेक व्यापार उदीम आणि नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर निर्बंध लादले. त्यात आठवडा किंवा पंधरा दिवसांची वाढ करण्यात येत आहे.

भारतात आजही करोनाचा संसर्ग वेगाने होत आहे, सुमारे साडेतीन लाख बाधित आणि चार हजार मृत्यू होत आहेत. हॉस्पिटल पूर्ण भरली आहेत. अंत्यसंस्कारांना जागा मिळत नाही, अशी स्थिती आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.