किव्ह, (युक्रेन) – युक्रेन आणि रशियादरम्यानचे युद्ध सुरू होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे दोन्ही बाजूच्या सैन्यावर मोठा ताण आला आहे. यातून सैनिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषामुळे वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन न करण्याची वृत्ती आणि बंडखोरीची भावना वाढीस लागू शकते, असे मत ब्रिटीश संरक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. हे युद्ध अनेक वर्षे चालू शकते, असा इशारा नाटोच्या प्रमुखांनीही दिला आहे. डोनबासमधील युद्धादरम्यान परिवर्तनशील नैतिकतेचे दर्शन घडू शकते, असे ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने युद्धाच्या दैनंदिन विश्लेषणामध्ये म्हटले आहे.
युक्रेनच्या सैन्याची जरी मोठी हानी होत असली तरी रशियाच्या सैन्याच्या मनोबावरही याचा परिणाम होतो आहे. युद्धाच्या तणावामुळे रशियाच्या सैन्यात वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन न करण्याची प्रवृत्ती बळावू शकते, असे ब्रिटीश संरक्षण तज्ञांनी म्हटले आहे. रशियाच्या सैन्यामध्ये शस्त्रे, उपकरणे आणि वैयक्तिक सुविधांची वानवा असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे.
अलिकडेच गॅझप्रोम या रशियाच्या कंपनीने जर्मनी आणि इटलीला केला जाणारा गॅस पुरवठा कमी केला आहे. इटलीने अन्य गॅस पुरवठादारांकडून गॅस खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे जर्मनीने आता गॅसचा वापर केवळ वीज उत्पादनापुरताच मर्यादित ठेवण्याचे ठरवले आहे.
हिवाळा संपेपर्यंत या दोन्ही देशांनी आपली गॅसची गरज भागेल एवढा साठा करून ठेवला आहे. मात्र आता या दोन्ही देशांना पर्यायी व्यवस्था करणे अनिवार्य बनणार आहे. मात्र ज्याप्रमाणे रशियाने 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतला होता, त्याप्रमाणे पुतीन यांनी युक्रेनचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला तर युरोपातील देशांना गॅससाठी अधिक मोबदला मोजावा लागण्याची शक्यता आहे, असे नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टेन्बर्ग यांनी म्हटले आहे.
हे युद्ध आणखी किती दिवस सुरू राहिल, याचा काही अंदाज बांधला जाऊ शकत नाही. आपल्याला दीर्घ काळाच्या युद्धासाठी तयार रहावे लागेल. युद्धाचा खर्च मोठा असला तरी युक्रेनला दिला जाणारा पाठिंबा कमी केला जाऊ नये.
जेन्स स्टॉल्टेन्बर्ग
नाटोचे सरचिटणीस