पाटणा – पाटण्यावरून दिल्लीला निघालेल्या एका विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच पेट घेतल्याची घटना आज घडली. विमानाला आग लागल्याचे लक्षात आल्यावर हे विमान तातडीने उतरवण्यात आले आणि विमानातीलसर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्पाईसजेट कंपनीच्या या विमानामध्ये 200 प्रवासी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाला आग लागल्याचे अधिकाऱ्यांना समजले. विमानतळाच्या शेजारील फुलवारी शरीफ सोसायटीतील नागरिकांनी विमानाला आग लागल्याचे बघून विमानतळाशी संपर्क साधून ही बाब ध्यानात आणून दिली होती, असे अधिकारयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इमर्जन्सी लॅन्डिंगनंतर या विमानातील प्रवाशांना पर्यायी विमानाने दिल्लीला पाठवून देण्यात आले, असे जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आंचल प्रकाश यांनी सांगितले.
विमानाला पक्षी धडकल्यामुळे आग लागल्याचा संशय
विमान उड्डाण करत असताना विमानाच्या इजिनाला पक्षी धडकल्याचा संशय कॉकपिटमधील कर्मचाऱ्यांना आला होता. विमानाची तपासणी केल्यावर खरोखर पक्षाची धडक बसल्याचे आढळून आले. विमानाच्या इंजिनाचे तीन पंखे तुटलेले होते. यामुळे इंजिनाला आग लागली होती. विमानातील प्रवाशांनी हा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट करून या थरारक प्रसंगाचे वर्णनही केले आहे.