कामशेत – कामशेतजवळील ताजे-बोरज गावच्या डोंगरातील हद्दीवर वनविभागाच्या जागेत रविवारी (दि. 6) सायंकाळी भरकटलेल्या हरणाच्या (भेकराची) पाडसाला कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविण्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
ताजे-बोरज गावच्या डोंगरातील शिवेवरील वनविभागाच्या जागेत एका हरिण व तिच्या दोन पाडसांवर कुत्र्यांच्या टोळक्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हरिणापासून तिची दोन पिल्ले भरकटली असल्याची माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीमने विभागास दिली होती. त्यानुसार सहायक वनसंरक्षक एस. बी. राजगुरू, वनक्षेत्रपाल सोमनाथ ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मंगेश सपकाळे, वनरक्षक गुलबर्गे, सहायक वनरक्षक रनसुरे यांनी भरकटलेल्या दोन पाडसांचा शोध घेऊन त्यांना कामशेत येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलला नेले असता त्यातील कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका पाडसाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले यांनी मृतघोषित केले. तर एक पिल्लू सुरक्षित असल्याने त्याला पुणे येथील प्राणी संग्रहालयात सुरक्षित पाठविण्यात येत असून, मृत झालेल्या हरणाच्या पाडसांवर नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनपाल मंगेश सपकाळे यांनी दिली.
डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांमध्ये गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या डोंगरातील पाणी जानेवारी पूर्वीच आटते, यामुळे डोंगरातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रहदारीच्या ठिकाणी येतात. यावेळी डोंगरालगतचे महामार्गावर अपघात होऊन किंवा कुत्र्यांच्या टोळक्याच्या हल्ल्यात त्यांचा अनेकदा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. मावळातील वाढत्या शिकारी तसेच वृक्षतोड यामुळे मावळातील वन्यप्राणी लोपपावण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी डोंगरावर वनविभागाकडून ठिकठिकाणी वनतळी चौक्या बनविणे गरजेचे आहे.