इराणच्या वैज्ञानिकाची उपग्रह संचालीत मशिनगनद्वारे हत्या

इराणने इस्त्रायलवर केला आरोप

तेहरान, दि. 7 – मागच्या आठवड्यात इराणच्या एका अणु शास्त्रज्ञाची हत्या करण्यात आली आहे. इस्त्रायलने उपग्रहावरून नियंत्रित करण्यात येणाऱ्या एका मशिनगनद्वारे त्यांची ही हत्या घडवून आणली असल्याचा आरोप इराकडून करण्यात येत आहे. इराणच्या मेहर न्युज कडून हा आरोप करण्यात आला आहे. ही न्युज एजन्सी इराण सरकारचीच एजन्सी असल्याचे मानले जात आहे.

तेहरान शहराजवळ 27 नोव्हेंबर रोजी इराणचे अणु वैज्ञानिक मोहसेन फकीरजादा यांची हत्या करण्यात आली होती. कार बॉम्ब स्फोटात ही हत्या घडवून गेल्याचा दावा या आधी करण्यात आला होता. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला या विषयी या आधी अनेक दावे करण्यात आले आहेत. स्फोटाने भरलेला ट्रक त्यांच्या गाडीवर धडकाऊन ही हत्या करण्यात आली असल्याचे एक वृत्त होते तर त्यांच्याच शरीर संरक्षकांनी त्यांची हत्या केली असे दुसऱ्या वृत्तात म्हटले होते. आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून दूरनियंत्रक मशिनगनद्वारे त्यांची हत्या करण्यात आल्याचेही वृत्त पसरले होते.

त्या पार्श्‍वभूमीवर आज हा नवीन दावा करण्यात आला आहे. इराणच्या अधिकाऱ्याच्या हवाला देऊन संबंधीत न्युज एजन्सीने म्हटले आहे की हा हल्ला इतका अचुक होता की त्यांच्या शेजारी काही इंचावर बसलेल्या त्यांच्या पत्नीला कोणतेही इजा झाली नाही. ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी त्यांच्या कार बरोबर एकूण 11 बॉडीगार्ड त्यांच्या गाड्यांतून चालले होते. मोहसेन यांच्या दिशेने एकूण 13 गोळ्या झाडण्यात आल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सन 2010 पासून इराणचे मारले गेलेले हे पाचवे अणु वैज्ञानिक आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.