पुण्यातील कंपनीचे संशोधन
यंत्र उत्पादन आणि वाढीसाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाने दिले एक कोटी रुपये
पुणे – कोणत्याही बंदिस्त वातावरणातील विषाणू, जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्र बनवण्याचा दावा केलेल्या एका कंपनीला केंद्र सरकारने एक हजार यंत्र बनवण्याचे कंत्राट दिले आहे. त्यासाठी केंद्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान खात्याने एक कोटी रुपयेही दिले आहेत. ही सगळी यंत्रे महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत.
यामध्ये करोनाचे रुग्ण, संशयित यांच्यामुळे संसर्गित होऊ शकणारे बंदिस्त क्षेत्र निर्जंतुक करण्यासाठी आणि हवा स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे. विलगीकरण सुविधांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तसेच विषाणूशी लढण्याची क्षमता वाढवून त्यांच्या आरोग्याची काळजी यामुळे घेतली जाईल, असाही दावा यात करण्यात आला आहे.
पुण्याच्या सायटेक पार्कमधील कंपनीने हे तयार केले आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या “निधी प्रयास’ कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील “जेक्लीन वेदर टेकनॉलॉजिस’ नामक कंपनी या यंत्रांची निर्मिती करणार आहे. “सायटेक एरॉन’ नावाच्या या ऋण आयन जनित्रामुळे बंदिस्त कक्षातील विषाणू, जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गावर नियंत्रण मिळवण्याला मदत होऊ शकणार आहे. रोगकारक विषाणू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठीची याची उपयोगिता जगभरातील अनेक प्रयोगशाळांनी- घरे,रुग्णालये, शाळा, उद्योग, इ. विविध बंदिस्त वातावरणांमध्ये- वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासल्याचा दावा या कंपनीने केला आहे. आयन जनित्र 1 तास चालवले असता त्या बंदिस्त कक्षातील विषाणूंचे प्रमाण 99.7.%नी कमी होतात, असाही कंपनीचा दावा आहे.
फ्लूचा विषाणू, कॉक्ससॅकी विषाणू, पोलिओचा विषाणू, मानवी करोना विषाणू, विविध ऍलर्जीकारक सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि बुरशी/ कवके अशा निरनिराळ्या रोगकारक घटकांविरुद्धही या आयन जनित्राची परिणामकारकता दिसून आली आहे. तसेच, रहदारीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानके, विमानतळ अशा ठिकाणी, आणि खासकरून विमानातील केबिन, घर, रुग्णालयातील वॉर्ड, अशा बंदिस्त भागात आढळणाऱ्या हवेतील तरंगत्या विषाणूंविरूद्धही हे आयन जनित्र उपयोगी ठरू शकते, असाही दावा कंपनीने केला आहे.